Manish Jadhav
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना 31 जुलैपासून ओव्हलमध्ये खेळला जाईल. भारताला मालिका बरोबरीत आणण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.
दरम्यान, या मालिकेत भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी, गोलंदाजी अद्याप अपेक्षित कामगिरी करु शकलेली नाही, ज्यामुळे संघाची चिंता वाढली आहे.
पाचव्या कसोटीपूर्वी सर्वात मोठा प्रश्न जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत आहे. त्याच्या उपलब्धतेवरच संघाची रणनीती अवलंबून असेल.
29 जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी सांगितले की, बुमराह पूर्णपणे फिट आहे, परंतु त्याच्या वर्कलोडवर लवकरच निर्णय घेतला जाईल. तो खेळणार की नाही, याचा अंतिम निर्णय कोच आणि कर्णधार घेतील.
तत्पूर्वी, मुख्य निवडकर्ते अजित अगरकर यांनी सांगितले होते की, वर्कलोड व्यवस्थापनामुळे बुमराह इंग्लंड दौऱ्यावर फक्त तीन कसोटी सामने खेळेल. त्याने या मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत.
या मालिकेत बुमराहने आतापर्यंत 14 विकेट्स घेतल्या आहेत, जो इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनंतर (17 बळी) दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
जर बुमराह शेवटच्या सामन्यात खेळला, तर त्याला इंग्लंडमध्ये सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनण्याची संधी असेल.
सध्या हा रेकॉर्ड इशांत शर्माच्या नावावर आहे, ज्याने 15 सामन्यांत 51 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने 12 सामन्यांत 51 विकेट्स घेतल्या असून, त्याला इशांतला मागे टाकण्यासाठी फक्त एका विकेटची गरज आहे.