Sameer Amunekar
नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे असते. मात्र बोलणेच कमी झाले, तर मनातील नाराजी आणि प्रश्न वाढत जातात.
सतत जोडीदाराच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या चुका काढल्याने त्यांना आपण कधीच पुरेसे चांगले नाही, असे वाटू शकते. यामुळे नात्यातील आत्मीयता हळूहळू कमी होते.
एखादी चूक माफ केल्यानंतर ती प्रत्येक भांडणात पुन्हा काढणे नात्यासाठी घातक ठरते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात नाराजी आणि असुरक्षितता निर्माण होऊ शकते.
आपल्या मनात काय आहे, हे समोरच्याने आपोआप समजावे अशी अपेक्षा केल्याने गैरसमज वाढतात. अपेक्षा आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करणे महत्त्वाचे आहे.
काम, मोबाईल आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये सतत व्यस्त राहिल्याने नात्यासाठी आवश्यक असलेला भावनिक वेळ कमी होतो. संवाद आणि एकत्र घालवलेला दर्जेदार वेळ नात्यातील जवळीक टिकवतो.
खोटे बोलणे, गोष्टी लपवणे किंवा वारंवार संशय घेणे यामुळे विश्वास कमी होतो. एकदा विश्वासाला मोठा धक्का बसला की नात्यात पूर्वीसारखी सहजता निर्माण करणे कठीण होऊ शकते.
प्रत्येक वादात स्वतःच बरोबर असल्याचे सिद्ध करण्याचा हट्ट नात्याला कमकुवत करतो. काही वेळा अहंकार बाजूला ठेवून माफी मागणे, समोरच्याचे म्हणणे ऐकणे आणि एकमेकांना समजून घेणे नाते टिकवण्यासाठी महत्त्वाचे असते.