Manish Jadhav
उचकी येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. पोटाच्या वरच्या बाजूला असलेला डायाफ्राम (Diaphragm) नावाचा स्नायू आणि गळ्यातील स्वरयंत्र (Larynx) अचानक आकुंचन पावल्यामुळे 'हिक' (Hic) असा आवाज येतो, यालाच आपण उचकी म्हणतो.
उचकी येण्याची अनेक सामान्य कारणे आहेत. जसे, खूप लवकर जेवणे, मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाणे, कार्बोनेटेड शीतपेय (सोडा) पिणे, जास्त ताण किंवा भीती वाटणे. सहसा अशा वेळी उचकी काही मिनिटांतच थांबते.
बहुतांश वेळा उचकी धोकादायक नसते. पण, जर तुम्हाला 48 तासांपेक्षा जास्त काळ उचकी येत असेल किंवा ती वारंवार आणि तीव्र स्वरुपात येत असेल, तर ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सतत येणाऱ्या उचकीचे कारण मेंदूशी संबंधित असू शकते. मेंदूतील मज्जासंस्थेमध्ये बिघाड झाल्यास किंवा मेंदूमध्ये गाठ असल्यास उचकी येऊ शकते. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये स्ट्रोकचे हे एक लक्षण असू शकते.
उचकीचे कारण पचनसंस्थेशी संबंधित आजारही असू शकतात. गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स किंवा पोटातील अल्सरमुळे अनेकदा उचकी येते. आतड्यांच्या किंवा यकृताच्या गंभीर आजारांमध्येही उचकीचे प्रमाण वाढू शकते.
श्वास घेण्याशी संबंधित काही आजारही उचकीचे कारण ठरु शकतात. निमोनिया, दमा किंवा छातीत संसर्ग झाल्यास डायाफ्रामवर दाब येऊन उचकी येऊ शकते.
आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम मूत्रपिंड करतात. मूत्रपिंडाचे कार्य बिघडल्यास किंवा मूत्रपिंड निकामी झाल्यास शरीरात विषारी घटक साचू लागतात, ज्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊन उचकी येऊ शकते.
जर तुम्हाला वारंवार आणि अनेक दिवस उचकी येत असेल, ती थांबत नसेल, किंवा सोबत इतर काही लक्षणे दिसत असतील, तर वेळ न दवडता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.