Pranali Kodre
वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने 28 जानेवारी 2024 रोजी ऑस्ट्रेलिया संघाला त्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर पराभवाचा धक्का दिला.
वेस्ट इंडिजने 8 धावांनी हा सामना जिंकत दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली.
गेल्या 36 वर्षात ऑस्ट्रेलियाला गॅबावर पराभूत करणारा वेस्ट इंडिज भारतानंतरचा दुसराच संघ आहे.
भारतीय संघाने जानेवारी 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाला गॅबावर 3 विकेट्सने पराभूत करत त्यांची तीन दशके या मैदानात अपराजीत राहण्याची मालिका खंडीत केली होती.
तसेच वेस्ट इंडिजने तब्बल 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना जिंकला. यापूर्वी 1997 साली पर्थवर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते.
या सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 50.5 षटकात 207 धावाच करता आल्या.
वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावात शेमार जोसेफने 7 विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या डावातही एक विकेट घेतली होती, त्यामुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
या सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 108 षटकात सर्वबाद 311 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 53 षटकात 289 धावांवर संपला. त्यामुळे वेस्ट इंडिजला 22 धावांची आघाडी मिळाली.
त्यानंतर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 72.3 षटकात 193 धावांवरच संपला, पण पहिल्या डावातील आघाडीमुळे वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचे आव्हान ठेवले होते.