Akshata Chhatre
चमकदार सफरचंद आकर्षक दिसत असले तरी, अनेकदा ते अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी त्यावर मेण आणि कीटकनाशकांचे अवशेष असतात.
मेण उष्णतेने वितळते, ज्यामुळे ते काढणे सोपे होते. एका भांड्यात हलके कोमट पाणी घ्या आणि त्यात सफरचंद १ ते २ मिनिटे बुडवा.
भाजी साफ करण्याच्या मऊ ब्रशने किंवा स्पंजने सफरचंदाला हलक्या हाताने गोल फिरवत चोळा. नंतर वाहत्या स्वच्छ पाण्याने धुऊन कापडाने पुसून घ्या. यामुळे मेणाचा वरचा थर आणि साचलेली घाण सैल होते.
१ लिटर स्वच्छ पाण्यात १ मोठा चमचा बेकिंग सोडा मिसळून द्रावण तयार करा. सफरचंद या द्रावणात सुमारे १० ते १५ मिनिटे भिजवा. नंतर हलके चोळून साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय मेण आणि पेस्टिसाइड्स दोन्ही काढण्यात अत्यंत प्रभावी आहे.
पांढरे व्हिनेगर अम्लीय असल्याने ते मेणाचा थर विरघळण्यास मदत करते. एका भांड्यात ५०% व्हिनेगर आणि ५०% पाणी मिसळा. सफरचंद या मिश्रणात सुमारे १० मिनिटे भिजवून ठेवा. शेवटी, साध्या पाण्याने धुऊन वाळवा. व्हिनेगर जंतू आणि मेण दोन्ही प्रभावीपणे काढून टाकते.
मिठाचे पाणी केवळ मेण काढण्यासच मदत करत नाही, तर ते बॅक्टेरिया दूर ठेवण्यासही उपयुक्त आहे. गरम पाण्यात १ ते २ मोठे चमचे मीठ विरघळवा. सफरचंद या मिठाच्या पाण्यात ५ ते १० मिनिटे बुडवून ठेवा. नंतर हलक्या हाताने चोळून स्वच्छ पाण्याने धुवा.
थोडासा बेकिंग सोडा घ्या, त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि थोडे पाणी मिसळून जाडसर पेस्ट किंवा हलके द्रावण तयार करा. ही पेस्ट बोटांच्या मदतीने थेट सफरचंदावर लावा आणि हळूवारपणे चोळा. २ मिनिटांनंतर, वाहत्या पाण्याखाली व्यवस्थित धुवा.
सफरचंद खाताना ते सालीसकट खाणे अधिक पौष्टिक असते, त्यामुळे सालीसकट खाण्यापूर्वी हे उपाय करणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.