Akshata Chhatre
तुम्हाला माहिती आहे का गोवा हा जेवढा समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे तेवढाच इथल्या मंदिरांसाठी आहे. गोव्यातील विविध भागांमध्ये सुंदर कलाकृतींनी सजलेली मंदिरं पाहायला मिळतात.
यांपैकीच एक म्हणजे गोव्यातलं पंढरपूर, म्हणजेच विठलापूरचं पांडुरंगाचं मंदिर. चैत्र महिन्यात होणारा चैत्री उत्सव या मंदिराची खासियत आहे.
आषाढी आणि कार्तिकी एकादशीला गोव्यातील भक्त इथेच येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटल्याचा आनंद मिळवतात.
साखळीमधलं हे विठ्ठलाचं मंदिर म्हणजे गोव्यातील प्रसिद्ध राणे घराण्याचं कुलदैवत आहे. सुमारे ६०० वर्षांपूर्वी उदयपूरहून आलेल्या राणे कुटुंबीयांनी हे मंदिर उभारलं. वाळवंटी नदीच्या शांत किनाऱ्यावर हे मंदिर पाहायला मिळतं.
मंदिराचं पुनर्निर्माण १९४२ मध्ये उत्तर भारतीय शैलीत केलं गेलं. मात्र मंदीराचा गर्भगृह अजूनही मूळ रूपातच आहे.
चैत्री उत्सवाच्या काळात इथे काष्ठातून सुबक कोरलेला एक सुंदर रथ पाहायला मिळतो. हा रथ अर्जुनाचा आहे असं मानलं जातं, जो भगवान श्रीकृष्ण चालवत होते. विठ्ठलापूर, साखळी येथील हे मंदिर राणे घराण्याचं केवळ कुलदैवत नाही तर त्यांच्या स्वाभिमान आणि संघर्षाचं प्रतीकही मानलं जातं.