Manish Jadhav
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडिया विजयी घोडदौड करत आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात बांगलादेशला 6 विकेट्सने पराभूत केले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानलाही 6 विकेट्सने पराभूत केले.
पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. कोहलीने 111 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचे 51वे शतक झळकावले.
अशाप्रकारे, विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 82 शतके पूर्ण करण्यात यशस्वी झाला. या शतकी खेळीदरम्यान, विराटने महान रिकी पॉन्टिंगला मागे टाकले. तसेच, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. आता फक्त त्याच्यापुढे सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा आहेत.
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपला तिसरा सामना 2 मार्च रोजी दुबई येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात प्रवेश करताच विराट खास रेकॉर्ड करेल.
2008 मध्ये पदार्पण करणाऱ्या विराटने आतापर्यंत 299 एकदिवसीय सामने खेळले असून न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो सहभागी होताच 300 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील होईल.
विराट 300 एकदिवसीय सामने खेळणारा जगातील 22वा खेळाडू बनेल. विराटच्या आधी फक्त 6 भारतीय खेळाडूंना हा टप्पा गाठता आला होता. भारतासाठी 300 हून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा महान पराक्रम करणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांचा समावेश आहे.
2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने 2 सामन्यांमध्ये 122 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत. त्याच्या पुढे शुभमन गिल (147) आणि बेन डकेट (165) आहेत.