Manish Jadhav
आयपीएल 2025 चे उर्वरित लीग स्टेज सामने शनिवारी (17 मे) पासून सुरु होत आहेत. उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात थरार पाहायला मिळणार आहे.
या सामन्यात विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. जर विराटने चांगली कामगिरी केली तर तो डेव्हिड वॉर्नर आणि रोहित शर्माला मागे सोडू शकतो.
आयपीएलमध्ये केकेआरविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट सामील होऊ शकतो. या सामन्यात कोहलीकडून शानदार फलंदाजीची आपेक्षा चाहते करत आहेत.
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विराट कोहलीची कामगिरी प्रभावी ठरली आहे. आतापर्यंत कोहलीने केकेआरविरुद्ध 35 सामन्यांमध्ये 32 डाव खेळले असून 40.84 च्या सरासरीने एकूण 1021 धावा केल्या आहेत.
या धावांमध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांचाही समावेश आहे. जर त्याने उद्याच्या सामन्यात केकेआरविरुद्ध आणखी 73 धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल.
सध्या, डेव्हिड वॉर्नर 1093 धावांसह या यादीत पहिल्या स्थानी आहे, तर रोहित शर्मा 1083 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. सध्याच्या हंगामात विराटचा जबरदस्त फॉर्म आरसीबीसाठी खूप महत्वाचा ठरत आहे.