Manish Jadhav
विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. एकदा का तो क्रीजवर स्थिरावला की, त्याला आऊट करणे गोलंदाजाला कठीण जाते.
विराट एक मोठा मॅचविनर आहे. त्याने नेहमीच महत्त्वाच्या सामन्यात आपला जलवा दाखवून दिला आहे. अनेक सामन्यात विराट टीम इंडियासाठी 'संकटमोचक' म्हणूनही समोर आला आहे.
आता पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (2025) फायनलमध्ये विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. हा त्याचा सलग तिसरा चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना असेल. याआधी त्याने 2013 आणि 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे फायनल सामने खेळले आहेत.
विराटने आतापर्यंत दोन एकदिवसीय विश्वचषक फायनल (2011 आणि 2023) आणि दोन चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल (2013, 2017) खेळले आहेत. यामध्ये, त्याने चार एकदिवसीय आयसीसी फायनल सामन्यांमध्ये 34.25 च्या सरासरीने 137 धावा काढल्या आहेत.
आयसीसी एकदिवसीय फायनल सामन्यात विराट भारताकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. त्याला आता नंबर वन सौरव गांगुलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. गांगुलीने भारतासाठी चार आयसीसी फायनलमध्ये एकूण 141 धावा काढल्या आहेत.
आता जर कोहलीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध आणखी पाच धावा केल्या तर तो सौरव गांगुलीचा आयसीसी एकदिवसीय सामन्यांच्या फायनल सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडेल. यासह तो गांगुलीलाही मागे सोडले.