Manish Jadhav
नव्या वर्षाची सुरुवात होताच विराट कोहलीच्या मैदानावर उतरण्याची उलटी गिनती सुरु झाली आहे. 11 जानेवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका सुरु होत असून, या मालिकेत कोहली इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे.
विराट कोहली क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा एक मोठा विश्वविक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 28 हजार धावा पूर्ण करण्याचा मान आता कोहलीला मिळणार आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 27,975 धावा केल्या आहेत. 28000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आता केवळ 25 धावांची गरज आहे. असे करणारा तो जगातील तिसराच फलंदाज ठरेल.
जागतिक क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ दोनच खेळाडूंनी 28 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये भारताचा सचिन तेंडुलकर (34,357 धावा) आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा (28 016 धावा) यांचा समावेश आहे.
सचिन तेंडुलकरने 644 डावांमध्ये 28 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. विराटने आतापर्यंत 623 डाव खेळले आहेत. म्हणजेच, पुढील 21 डावांत कोहलीने 25 धावा केल्या तरी तो सचिनपेक्षा वेगवान ठरेल.
श्रीलंकेच्या कुमार संगकाराने आपल्या कारकिर्दीतील 666 व्या डावात 28 हजार धावांचा आकडा गाठला होता. विराट कोहली या दोघांनाही मागे टाकत जगात पहिल्या क्रमांकावर विराजमान होईल.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वन-डे सामन्यात कोहली 25 धावा करुन हा विक्रम आपल्या नावावर करेल अशी चाहत्यांना आशा आहे. जर पहिल्या सामन्यात हुकले, तर मालिकेतील पुढच्या दोन सामन्यांत विराट हा कारनामा नक्कीच करेल.