Manish Jadhav
विजयदुर्ग हा मूळचा शिलाहार वंशातील राजा भोज (दुसरा) याने 1205 मध्ये बांधला. पुढे 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याचे 'विजयदुर्ग' असे नामकरण केले.
हा किल्ला तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला असून एका बाजूला वाघोटन खाडी आहे. त्याच्या भौगोलिक स्थानामुळे याला 'कोकणचा पूर्व जिब्राल्टर' असेही संबोधले जाते.
महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करुन त्याला अधिक मजबूत केले. या किल्ल्याला तीन पदरी प्रचंड तटबंदी आणि 27 बुरुज आहेत, जे आजही सुस्थितीत पाहायला मिळतात.
विजयदुर्गच्या संरक्षणाचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे समुद्राच्या पाण्याखाली असलेली 122 मीटर लांब भिंत. शत्रूची मोठी जहाजे या भिंतीला धडकून फुटत असत.
किल्ल्याच्या आत 500 मीटर लांबीचा एक गुप्त भुयारी मार्ग आहे. तसेच, पावसाचे पाणी साठवण्यासाठी किल्ल्यात पाण्याचे अनेक तलाव आणि टाक्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात विजयदुर्ग हे मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र बनले. येथूनच इंग्रज, डच आणि पोर्तुगीज आरमारावर वचक ठेवला जात असे.
1868 मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ पियरे जॅन्सेन यांनी विजयदुर्ग किल्ल्यावरुन सूर्यग्रहणाचे निरीक्षण करताना 'हेलियम' वायूचा शोध लावला होता. विज्ञानाच्या दृष्टीने हे जागतिक महत्त्वाचे ठिकाण आहे.
आजही किल्ल्यावरील जुन्या तोफा, कोठारे, साहेबाचा ओटा आणि समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे गर्दी करतात. हा किल्ला मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देतो.