Manish Jadhav
लक्ष्मी विलास पॅलेस हा जगातील सर्वात मोठ्या खाजगी निवासस्थानांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, हा राजवाडा इंग्लंडच्या बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चार पट मोठा आहे.
या भव्य राजवाड्याची निर्मिती 1890 मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांनी केली होती. त्याकाळी हा राजवाडा बांधण्यासाठी सुमारे 60 लाख रुपये खर्च आला होता.
हा राजवाडा 'इंडो-सारासेनिक' शैलीत बांधला गेला आहे. यात हिंदू, इस्लामिक आणि गॉथिक वास्तुकलेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. याचे डिझाइन मेजर चार्ल्स मँट यांनी केले होते.
हा राजवाडा 500 एकरपेक्षा जास्त परिसरात पसरलेला आहे. राजवाड्याच्या आवारात एक 10 होलचा गोल्फ कोर्स आणि मोती बाग क्रिकेट मैदान देखील आहे.
1890 मध्ये बांधला असूनही त्या काळी या राजवाड्यात लिफ्ट आणि टेलिफोन सारख्या आधुनिक सुविधा होत्या, जे त्या काळातील मोठे आश्चर्य होते.
राजवाड्याच्या आत इटालियन मार्बल, दुर्मिळ कलाकृती आणि बेल्जियमच्या काचांचा वापर करण्यात आला आहे. येथील 'दरबार हॉल'चे सौंदर्य आणि तिथले मोझॅक फ्लोअरिंग पर्यटकांना भुरळ घालते.
राजवाड्याच्या एका भागात महाराजा फत्तेसिंग संग्रहालय आहे, जिथे गायकवाड घराण्यातील दुर्मिळ शस्त्रास्त्रे, शिल्पे आणि जगप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांची मूळ चित्रे जतन केलेली आहेत.
लक्ष्मी विलास पॅलेसची भव्यता पाहून अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. 'प्रेम रतन धन पायो' आणि 'ग्रँड मस्ती' सारख्या चित्रपटांचे काही भाग येथे चित्रित झाले आहेत.