Manish Jadhav
वासोटा किल्ला सातारा जिल्ह्यातील जावळीच्या घनदाट अरण्यात आणि कोयना वन्यजीव अभयारण्याच्या कुशीत वसलेला आहे. हा किल्ला 'व्याघ्रगड' या नावानेही ओळखला जातो.
या किल्ल्यावर जाण्यासाठी बामणोली किंवा तापोळा येथून कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातून बोटीने प्रवास करावा लागतो. हा जलप्रवास ट्रेकर्ससाठी एक वेगळाच आणि थरारक अनुभव असतो.
वासोटा ट्रेक हा संपूर्णपणे एका घनदाट जंगलातून जातो. सह्याद्रीच्या या भागात बिबट्या, अस्वल, रानगवे, आणि विविध प्रकारचे पक्षी आढळतात. त्यामुळे वनविभागाच्या परवानगीनेच येथे जाता येते.
या किल्ल्याची निर्मिती 12व्या शतकात शिलाहार वंशातील राजा भोज (दुसरा) याने केली होती. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी स्वराज्यात सामील केल्यानंतर या किल्ल्याचे महत्त्व आणखी वाढले.
वासोटा किल्ल्याचा सर्वात मोठा मुख्य आकर्षण म्हणजे 'बाबू कडा'. हा एक अत्यंत सरळ आणि खोल कडा आहे. या कड्यावरुन खाली पाहिले असता अंगावर काटा येतो आणि सह्याद्रीचे अथांग रुप दिसते.
सह्याद्रीतील सर्वात कठीण आणि निसर्गरम्य 'जंगल ट्रेक' म्हणून वासोटा ओळखला जातो. साधारण 2 ते 3 तासांच्या चढाईनंतर किल्ल्यावर पोहोचता येते. हा ट्रेक तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
किल्ल्यावर सध्या फारसे अवशेष उरलेले नाहीत, तरीही मारुतीचे मंदिर, जुने पाण्याचे टाके, वाड्यांचे अवशेष आणि तटबंदी पाहायला मिळते. गडावरुन शिवसागर जलाशयाचे विहंगम दृश्य दिसते.
हा किल्ला अभयारण्यात असल्याने येथे प्लास्टिक नेण्यास सक्त मनाई आहे. तसेच, संध्याकाळी जंगलात हिंस्त्र श्वापदांचा वावर असल्याने दुपारनंतर गडावर थांबण्यास परवानगी नसते आणि सायंकाळी 5च्या आधी परत यावे लागते.