Manish Jadhav
यंदाचा आयपीएल हंगाम (IPL 2025) राजस्थान रॉयल्ससाठी खास गेला नाही. संघाला यंदाच्या हंगामात म्हणावी तशी छाप सोडता आली नाही. मात्र राजस्थानसाठी 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली.
नुकत्याच झालेल्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात वैभवने 15 चेंडूत 40 धावांची खेळी खेळली. त्याची हीच खेळी त्याला एका बाबतीत नंबर 1 बनवण्यात महत्त्वाची ठरली. त्याने निकोलस पूरन आणि टिम डेव्हिड यांना मागे सोडले.
जशी संधी मिळाली तशी वैभवने धडाकेबाज खेळी खेळली. यंदाच्या हंगामात सर्वाधिक स्ट्राईक रेटच्या बाबतीत वैभवने नंबर 1 चा किताब मिळवला. सध्या वैभवचा स्ट्राईक रेट 219.10 एवढा आहे.
वैभवनंतर दुसऱ्या क्रमांकावर निकोलस पूरन आहे, ज्याने 200.98 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर टिम डेव्हिड असून त्याने 193.75 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. तर चौथ्या क्रमांकावर प्रियांश आर्य असून त्याने 190.37 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
वैभवने यंदाच्या हंगामात 6 सामन्यांमध्ये 219.10 च्या शानदार स्ट्राईक रेटने 195 धावा केल्या. त्याने या अफलातून खेळीत केवळ षटकार आणि चौकारांनी 166 धावा केल्या. म्हणजेच त्याने जवळजवळ 85 टक्के धावा चौकार मारुन केल्या.
वैभवने 28 एप्रिल 2025 रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला.
त्याने आपल्या शानदार खेळीत 7 चौकार आणि 11 षटकार मारल होते. 265.78 च्या स्ट्राईक रेटने 101 धावा काढल्या होत्या. आयपीएलमधील भारतीय फलंदाजाचे हे सर्वात जलद शतक ठरले. तसेच, टी-20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडूचा विक्रमही त्याने केला.