Manish Jadhav
अमेरिकेत सोमवारपासून विंटर स्टॉर्मने कहर केला आहे. या वादळाचा प्रभाव मध्य अमेरिकेपासून मध्य अटलांटिकपर्यंत दिसून आला आहे.
हिमवादळ, हिमवृष्टी आणि थंडीच्या लाटेमुळे थंडी आणखीनच वाढली आहे. हवामान खात्याने काही भागात 'दशकातील सर्वात जास्त हिमवृष्टी' होण्याचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने केंटकी, व्हर्जिनिया, वेस्ट व्हर्जिनिया, कॅन्सस, आर्कान्सा आणि मिसूरी या राज्यांमध्ये आपत्कालीन अलर्ट जारी केला आहे, त्याचवेळी, फ्लोरिडामध्ये हिमवर्षाव होत आहे.
नॅशनल वेदर सर्व्हिसने कॅन्सस आणि मिसूरीसाठी चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. हवामानातील बदलांमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या असून विमान सेवेवरही परिणाम झाला आहे.
विंटर स्टॉर्ममुळे अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. मिसूरी राज्य पोलिसांनी सांगितले की, एक हजाराहून अधिक वाहने रस्त्यावर अडकून पडली असून 356 अपघात झाले आहेत, तर 31 जण जखमी झाल्याचीही नोंद आहे.
अमेरिकेच्या हवामान खात्याचे अधिकारी ओरावेक यांच्या म्हणण्यानुसार, या विंटर स्टॉर्मदरम्यान 63 दशलक्ष अमेरिकन नागरिकांना चेतावणी देण्यात आली आहे.