Manish Jadhav
गुजरातमधील जुनागढ येथे असलेला ऐतिहासिक उपरकोट किल्ला हा त्याच्या अद्वितीय वास्तुकला आणि गौरवशाली इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.
उपरकोट किल्ल्याची निर्मिती चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात इसवी सन पूर्व 319 च्या सुमारास झाली असे मानले जाते. मौर्य साम्राज्यापासून सुरु झालेला या किल्ल्याचा प्रवास पुढे अनेक शतके विविध राजवंशांच्या वैभवाचा साक्षीदार राहिला.
या किल्ल्याचा खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ सोळंकी आणि चुडासमा शासकांच्या काळात आला. नवघण आणि रा' खेंगार यांसारख्या पराक्रमी राजांनी या किल्ल्यावरुन राज्य केले. त्यांच्या काळात किल्ल्याची तटबंदी अधिक मजबूत करण्यात आली.
उपरकोट किल्ल्याची रचना इतकी अभेद्य होती की, इतिहासकाळात या किल्ल्याला वेगवेगळ्या शत्रूंनी तब्बल 16 वेळा वेढा घातला होता. एका वेढ्याच्या वेळी तर तब्बल 12 वर्षे हा किल्ला शत्रूशी लढत राहिला, पण शत्रूला तो सहज जिंकता आला नाही.
किल्ल्याच्या आत असलेल्या बौद्ध गुहा या किल्ल्याच्या प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देतात. इसवी सन 2 या शतकातील या दुमजली गुहा बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान आणि ध्यान केंद्र म्हणून वापरल्या जात असत.
या किल्ल्यावर इजिप्तमधून आणलेल्या 'नीलम' आणि 'माणेक' नावाच्या दोन महाकाय तोफा आजही पाहायला मिळतात. 1538 मध्ये पोर्तुगीजांविरुद्धच्या लढाईत दीवच्या सुलतानाला मदत म्हणून तुर्की नौदलाने या तोफा दिल्या होत्या, ज्या नंतर उपरकोटवर आणल्या गेल्या.
15व्या शतकात गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने जुनागढच्या राजाचा पराभव करुन या किल्ल्यावर ताबा मिळवला. त्याने किल्ल्याची डागडुजी करुन त्याचे नाव 'मुस्तफाबाद' ठेवले होते. पुढे हा किल्ला मुघलांच्या आणि नंतर जुनागढच्या नबाबांच्या नियंत्रणात राहिला.