Manish Jadhav
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला 2 वर्षे पूर्ण होण्याआधीच युक्रेनने रशियाच्या बेलगोरोड शहरावर अत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. या हवाई हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला तर 18 हून अधिक लोक जखमी झाले.
युक्रेनने रशियाच्या सीमेपासून 30 किलोमीटर आत असलेल्या बेलगोरोड शहरावर हा हल्ला केला आहे. 28 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याआधी युक्रेनने हा भीषण हल्ला करुन रशियाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, झेलेन्स्कीने अद्याप पराभव स्वीकारलेला नाही.
बेलगोरोड शहराचे गव्हर्नर व्याचेस्लाव ग्लॅडकोव्ह म्हणाले की, "प्राथमिक माहितीनुसार, बेलगोरोडमध्ये एका लहान मुलासह पाच जण ठार तर 18 जण जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले जात आहे. सर्व आवश्यक मदत पुरवली जात आहे.''
रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी या भागात 14 युक्रेनियन रॉकेट पाडले आहेत, जे RM-70 मल्टिपल रॉकेट लाँचर सिस्टमद्वारे उडवण्यात आले होते.
डिसेंबर महिन्यात युक्रेनियन हल्ल्यात 25 लोक मारले गेल्यानंतर रशियन अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात शहरातून काही रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली होती.
रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनविरुद्ध युद्ध सुरु केल्यापासून सुमारे 400 मुलांसह लाखो लोक आधीच विस्थापित झाले आहेत.