गोमन्तक डिजिटल टीम
मोबाईल ग्राहकांना इंटरनेट डेटा न घेता देखील फक्त दूरध्वनी आणि एसएमएससाठी रिचार्ज प्लॅन देण्याचे आदेश ट्रायने मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.
देशातील लाखो मोबाईल ग्राहक विविध कारणांमुळे इंटरनेट डेटा घेणे पसंत करत नाहीत. त्यांना केवळ दूरध्वनीवर बोलण्यासाठी रिचार्ज करणे सोईस्कर असते.
अशा ग्राहकांना आता केवळ फोन रिचार्ज करता येणार आहे.
फक्त दूरध्वनी आणि एसएमएससाठीच्या विशेष रिचार्ज कूपनची वैधता तीन महिन्यांऐवजी आता एक वर्ष करण्याचेही बंधन या नव्या नियमानुसार दूरध्वनी कंपन्यांवर असणार आहे.
भारतात अजूनही १५ कोटी ग्राहक ‘टू-जी’ वापरकर्ते तसेच ड्युएल सिमकार्ड दूरध्वनी नसलेले किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा ग्रामीण रहिवासी आहेत.
त्यांना फक्त हव्या असलेल्या दूरध्वनी सेवेसाठीच पैसे भरता येतील. ज्यांच्या घरी ब्रॉडबँड किंवा वायफाय सुविधा आहे किंवा जे फार तंत्रज्ञानस्नेही नाहीत, त्यांनाही इंटरनेट डेटा नको असतो.
ज्यांना फक्त दूरध्वनी आणि एसएमएस करण्यासाठीच डेटा लागतो. त्यांनाही नव्या नियमाचा लाभ होणार आहे.