Manish Jadhav
तोरणा हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगरी किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची सुमारे 1,403 मीटर आहे. मान्सूनमध्ये जेव्हा हा विशाल किल्ला ढगांच्या दुलईत हरवून जातो, तेव्हा त्याचे रुप अधिकच विलोभनीय दिसते.
ऐतिहासिकदृष्ट्या तोरणा किल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे. इ.स. 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते. महाराजांनी याचे नाव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले होते, जे याच्या अथांग विस्ताराला साजेसे आहे.
तोरणा किल्ल्याला दोन प्रसिद्ध माच्या आहेत. एक 'झुंजार माची' आणि दुसरी 'बुधला माची'. पावसाळ्यात या माच्यांवरुन वाहणारा गार वारा आणि सभोवताली असणारी खोल दरी ट्रेकर्सच्या काळजाचा ठोका चुकवते. विशेषतः झुंजार माचीचा चढ कठीण असल्याने पावसाळ्यात येथे ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो.
पावसाळा सुरु होताच तोरणा किल्ला आणि परिसर गर्द हिरवाईने नटून जातो. किल्ल्याच्या वाटेवर अनेक छोटे-मोठे हंगामी धबधबे प्रवाशांचे स्वागत करतात. गडावरुन खाली दिसणारे वेल्हे तालुक्याचे विहंगम दृश्य आणि धुक्याची दुलई निसर्गप्रेमींना भुरळ पाडते.
तोरणाचा ट्रेक हा 'मध्यम ते कठीण' श्रेणीत येतो. वेल्हे गावातून गडावर जाण्यासाठी मुख्य वाट आहे. पावसाळ्यात काही ठिकाणी खडक निसरडे होत असल्याने आणि गडाच्या शेवटच्या टप्प्यातील कातळात खोदलेल्या पायऱ्या चढताना ट्रेकर्सचा खरा कस लागतो. साहसी लोकांसाठी हा उत्तम मान्सून ट्रेक आहे.
किल्ल्यावर आल्यानंतर बिनीचा दरवाजा, कोठी दरवाजा यांसारख्या मजबूत ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. गडावर 'तोरणजाई देवी' आणि 'मेंगाई देवी'चे मंदिर आहे. तसेच पावसाळ्यातही पाणी साठवून ठेवणारे 'झुंजार टाके' आणि इतर पाण्याचे खडक कोरलेले टाके गडाचे वैभव दर्शवतात.
पावसाळ्यात तोरणा किल्ल्यावर जाताना योग्य ट्रेकिंग शूज वापरणे अनिवार्य आहे. गडावर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे रेनकोट सोबत ठेवावा. तसेच कठीण टप्प्यांवर घाई न करता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण मान्सूनमध्ये येथील सौंदर्य जितके सुंदर आहे तितकेच ते आव्हानात्मकही आहे.