Manish Jadhav
पहिल्यांदाच प्रेमात पडणे हा आयुष्यातील एक अतिशय सुंदर आणि रोमांचक अनुभव असतो. पण या प्रवासात भावनांच्या ओघात वाहून न जाता काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.
प्रेमाची सुरुवात झाली की, सर्व काही पटकन व्हावं असं वाटतं. पण घाईघाईत घेतलेले निर्णय नंतर जड जाऊ शकतात. एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या आणि नाते नैसर्गिकरित्या फुलू द्या.
कोणाच्या तरी प्रेमात पडलात याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या आवडीनिवडी, मित्र आणि छंदांकडे दुर्लक्ष करावं. नात्यात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
मनातल्या भावना, अपेक्षा किंवा एखादी गोष्ट आवडली नसेल तर ती स्पष्टपणे सांगायला शिका. संवाद जेवढा मोकळा असेल, तेवढे गैरसमज कमी होतील.
प्रत्येकाची एक 'पर्सनल स्पेस' असते. समोरच्या व्यक्तीच्या प्रायव्हसीचा आदर करा. सतत फोन करणे किंवा मेसेजचा लगेच रिप्लाय का आला नाही म्हणून जाब विचारणे टाळा.
सुरुवातीला सर्व काही गुलाबी वाटतं, पण समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापूर्वी थोडी सावधगिरी बाळगा. व्यक्तीला पूर्णपणे पारखून घेतल्याशिवाय भावनिकरित्या पूर्णपणे गुंतू नका.
प्रेमात असताना आपण अनेकदा समोरच्या व्यक्तीचे दोष पाहू शकत नाही. अशा वेळी तुमचे जवळचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्य तुम्हाला योग्य आरसा दाखवू शकतात. त्यांच्या मताकडे दुर्लक्ष करु नका.
नातं सुरु होताच लगेच सोशल मीडियावर फोटो शेअर करणे किंवा 'रिलेशनशिप स्टेटस' बदलण्याची घाई करु नका. नातं थोडं स्थिरावू द्या, मगच ते सार्वजनिक करा.
जर तुम्हाला एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी तयार नसाल, तर ठामपणे 'नाही' म्हणायला शिका. प्रेम म्हणजे केवळ तडजोड नव्हे, तर एकमेकांचा आदर करणे होय.