दैनिक गोमन्तक
एड्स सोसायटीने शुक्रवारी एड्स दिनानिमित्त जारी केलेल्या आकडेवारीत बार्देस तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 46 एचआयव्ही रुग्ण आढळून आल्याचे नमूद केले आहे.
यामागे या तालुक्यात वाढलेला वेश्याव्यवसाय हेच मुख्य कारण असू शकते,
असा निष्कर्ष मानव तस्करी पीडित महिलांचे पुनर्वसन करण्याच्या कामात आतापर्यंत मोठी कामगिरी केलेल्या ‘अर्ज’ या संघटनेचे अध्यक्ष अरुण पांडे यांनी काढला आहे.
यासाठी त्यांनी मागच्या दहा वर्षांतील आकडेवारीचा आधार घेतला आहे. गेल्या दहा वर्षांत गोव्यात मानव तस्करी पीडित 623 महिलांची सुटका करण्यात आली.
त्यातील 296 महिलांची सुटका बार्देस तालुक्यातच झाली होती. हे प्रमाण एकूण संख्येच्या 45 टक्के आहे.
त्यातून बार्देस तालुक्यात एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण का वाढले असावे याचा तर्क काढता येताे, असे त्यांनी म्हटले आहे.
या आपल्या तर्काला आधार देताना पांडे म्हणाले, ज्यावेळी मुरगाव तालुक्यात वेश्याव्यवसायाचे प्रमाण सर्वांत मोठे होते, त्यावेळी याच तालुक्यात एचआयव्ही रुग्णांची संख्याही मोठी हाेती. आता बार्देस तालुक्यात हा व्यवसाय वाढत असून तिथे एचआयव्ही रुग्णही जास्त आढळून येत आहेत.
या गोष्टीकडे सरकारने गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. वेश्याव्यवसायाचा सामाजिकरीत्याही विपरित परिणाम होऊ शकतो. अशा व्यवसायात गुंतलेल्या पीडित महिलांशी जो शरीरसंबंध ठेवला जातो तो कित्येकवेळा सुरक्षितरीत्या ठेवलेला नसतो.
यातूनच या पीडित एचआयव्हीच्या बळी पडतात आणि या पीडितांकडे सुरक्षितरीत्या यौन संबंध न ठेवल्याने एचआयव्ही बाधित झालेल्या पुरुषांकडून त्यांच्या पत्नीनांही ही बाधा होऊ शकते. त्यामुळेच या सर्वांचे परिणाम व्यापक आहेत.
अरुण पांडे, ‘अर्ज’ संस्था