Manish Jadhav
पुणे जिल्ह्यातील चाकण येथील हा भुईकोट किल्ला मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. या किल्ल्याला 'संग्रामदुर्ग' असेही म्हणतात.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तारताना आदिलशहाकडून हा किल्ला जिंकला. किल्ल्याचे महत्त्व ओळखून त्यांनी त्याचे नाव 'संग्रामदुर्ग' असे ठेवले आणि किल्लेदार म्हणून फिरंगोजी नरसाळे यांची नियुक्ती केली.
1660 मध्ये औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान लाखभर सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. त्याने पुण्यावर ताबा मिळवून शिवाजी महाराजांच्या लाल महालात तळ ठोकला.
शाहिस्तेखानाने 20 हजार सैनिकांसह चाकणच्या किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी किल्ल्यावर फक्त 300 ते 400 मावळे आणि किल्लेदार फिरंगोजी नरसाळे होते.
या छोट्याशा सैन्याने शाहिस्तेखानाच्या अफाट सैन्याला तब्बल 55 दिवस झुंजवत ठेवले. त्यांनी प्रचंड शौर्य दाखवत मुघलांचे मोठे नुकसान केले.
किल्ल्याची तटबंदी तोडण्यासाठी मुघलांनी भुयार खोदले आणि त्यात स्फोट घडवून आणला. तटबंदीचा काही भाग उडाल्यानंतर त्यांनी किल्ल्यात प्रवेश केला.
किल्ला जरी हातातून गेला तरी फिरंगोजी नरसाळे यांच्या पराक्रमावर शिवाजी महाराज खूप खूश झाले. त्यांनी फिरंगोजींना बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला.
फिरंगोजी नरसाळे यांनी दाखवलेल्या या अजोड पराक्रमाने हे सिद्ध केले की, मराठा मावळे हे केवळ किल्ल्यांचे रक्षणच करत नव्हते, तर ते स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत होते.