Manish Jadhav
तेरेखोल किल्ला हा महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेवर वसलेला एक ऐतिहासिक वारसा आहे.
तेरेखोल किल्ला गोवा राज्याच्या अगदी उत्तर टोकाला, तेरेखोल नदीच्या मुखावर एका टेकडीवर वसलेला आहे. हा किल्ला महाराष्ट्र (सिंधुदुर्ग) आणि गोवा यांच्या सीमेवर असून इथून अरबी समुद्राचे अथांग आणि विहंगम दृश्य दिसते.
या किल्ल्याचे मूळ बांधकाम 17व्या शतकात सावंतवाडीचे महाराज खेम सावंत भोसले यांनी केले होते. सुरुवातीच्या काळात हा किल्ला मराठा साम्राज्याच्या संरक्षणासाठी आणि समुद्रावर नजर ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता.
1746 मध्ये पोर्तुगीज व्हाईसरॉय डोम पेड्रो डी अल्मेडा याने या किल्ल्यावर आक्रमण करुन तो जिंकून घेतला. त्यानंतर 1764 मध्ये पोर्तुगीजांनी या किल्ल्याची डागडुजी करुन त्याचे नूतनीकरण केले.
किल्ल्यात 'सेंट अँथनी' यांना समर्पित एक छोटे पण अतिशय सुंदर चर्च आहे. हे चर्च साधारणपणे 1764 मध्ये बांधण्यात आले असून ते आजही सुस्थितीत आहे. केवळ सणासुदीच्या दिवशी हे चर्च लोकांसाठी उघडले जाते.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि विशेषतः गोवा मुक्ती आंदोलनात या किल्ल्याचे मोठे महत्त्व आहे. 15 ऑगस्ट 1954 रोजी भारतीय सत्याग्रहींनी जीवाची बाजी लावून या किल्ल्यावर तिरंगा फडकवला होता, ज्याची नोंद इतिहासात सुवर्ण अक्षरांनी झाली आहे.
तेरेखोल नदीच्या खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला मोक्याचा होता. इथून होणाऱ्या समुद्री व्यापारावर लक्ष ठेवणे आणि शत्रूच्या जहाजांना रोखणे या किल्ल्यामुळे सोपे जात असे.
'तेरेखोल' हे नाव तेरेखोल नदीवरुन पडले आहे. स्थानिक भाषेत 'तीर-खोल' म्हणजे नदीचा खोल किनारा असाही त्याचा संदर्भ लावला जातो. या किल्ल्याच्या तटबंदीवरुन दिसणारा समुद्राचा अथांग विस्तार डोळ्यांचे पारणे फेडतो.
काळाच्या ओघात या किल्ल्याचे रुपांतर एका आलिशान 'हेरिटेज हॉटेल' मध्ये करण्यात आले. ऐतिहासिक वास्तूचा मूळ ढाचा कायम ठेवून येथे पर्यकांसाठी राहण्याची उत्तम सोय केली, ज्यामुळे हा किल्ला पर्यटनाचे मोठे केंद्र बनला.