Manish Jadhav
हरिश्चंद्रगडाचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. या किल्ल्याचे बांधकाम साधारणपणे 6व्या शतकात 'कलचुरी' राजवंशाच्या काळात झाल्याचे मानले जाते. या गडावरील लेणी याच काळात खोदली गेली असावीत.
गडावरील केदारेश्वर गुहेत 5 फूट उंचीचे शिवलिंग असून सभोवताली पाणी आहे. या शिवलिंगाभोवती असलेले चार खांब हे चार युगांचे प्रतीक मानले जातात. सद्यस्थितीत फक्त एकच खांब शिल्लक असून, तो तुटल्यास जग संपेल, अशी लोककथा आहे.
11व्या आणि 12व्या शतकात हा किल्ला यादव साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. या काळात गडावर अनेक महत्त्वाची बांधकामे झाली. या गडाचा वापर प्रामुख्याने माळशेज घाटातून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे.
14व्या शतकातील महान संत चांगदेव महाराज यांनी या गडावर वास्तव्य केले होते. त्यांनी आपला प्रसिद्ध 'तत्त्वसार' हा ग्रंथ हरिश्चंद्रगडावरच लिहून पूर्ण केला, असे मानले जाते.
गडावरील हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे 10व्या किंवा 11व्या शतकातील कोरीव कामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर 'हेमाडपंती' शैलीचे असून त्याच्या भिंतींवर आणि छतावर पौराणिक कथांचे सुंदर कोरीव काम आढळते.
मध्ययुगीन काळात हा किल्ला निजामशाही आणि मोगलांच्या ताब्यात होता. मात्र, 1747 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला मोगलांकडून जिंकून स्वराज्यात सामील केला. मराठ्यांच्या काळात गडाची तटबंदी अधिक मजबूत करण्यात आली.
गडावरील प्रसिद्ध 'कोकण कडा' हा केवळ पर्यटनासाठी नाही, तर लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचा होता. या 3000 फूट खोल कड्यामुळे गडाच्या पश्चिमेकडून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवणे आणि गडाचे रक्षण करणे सोपे जात असे.
1818 मध्ये मराठेशाहीच्या अस्तानंतर हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांनी किल्ल्यावरील अनेक वाटा आणि दरवाजे तोडून टाकले जेणेकरुन क्रांतीकारकांना तिथे आश्रय घेता येऊ नये. त्यानंतर हा किल्ला अनेक दशके विस्मृतीत होता.