Pranali Kodre
मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धा 14 जानेवारीपासून सुरू झाली आहे. या स्पर्धेत अनेक युवा आणि अनुभवी खेळाडू खेळताना दिसत आहेत.
दरम्यान याच स्पर्धेत काही अशाही खेळाडू आहेत, ज्यांनी काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षांपूर्वी मुलांना जन्म दिला आहे. म्हणजे आई असणाऱ्या खेळाडूही 2024 सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळत आहे, अशाच महिला खेळाडूंवर एक नजर टाकू.
जर्मनीची तातजाना मारिया हीला 11 वर्षांची आणि अडीच वर्षांच्या मुली आहेत. तिने तिच्या दोन्ही मुलींच्या जन्मानंतरही आपली कारकिर्द पुढे कायम केली आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर राहिलेल्या अँजलिक केर्बरने फेब्रुवारी 2023 मध्ये मुलीला जन्म दिला आहे. तिच्या मुलीच्या जन्मानंतर काही महिन्यातच ती टेनिस कोर्टवर परतली आहे.
अमेरिकेची 27 वर्षीय टेनिसपटू टेलर टाऊनसेंड हिला देखील अडीच वर्षांचा मुलगा आहे. मुलाच्या जन्मानंतरही तिनेही खेळणे कायम केले आहे.
डेन्मार्कची स्टार टेनिसपटू कॅरोलिन वोझ्नियाकी हिला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. तिने 2020 मध्ये निवृत्तीही घेतली होती. त्यानंतर तिने 2021 मध्ये मुलीला आणि 2022 मध्ये मुलाला जन्म दिला. यानंतर 2023 मध्ये ती टेनिस कोर्टवर पुन्हा परतली.
ऑलिम्पिक पदक विजेती युक्रेनची टेनिसपटू एलिना स्विटोलिना हिने 2022 मध्ये मुलीला जन्म दिला आहे. तिने टेनिसपटू गेल मॉनफिल्सबरोबर 2021 मध्ये लग्न केले आहे. दरम्यान मुलीच्या जन्मानंतरही तिने खेळणे चालू ठेवले.
बेल्जियमची 34 वर्षीय टेनिसपटू यानिना विकमायर हिने 2021 मध्ये मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर काही महिन्यातच ती टेनिस खेळण्यासाठी परतली.
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर राहिलेली व्हिक्टोरिया अझारेंकाने 2016 साली मुलाला जन्म दिला आहे. मात्र ती तिचा बॉयफ्रेंड बिली मॅककिगपासून वेगळी झाल्यानंतर त्यांच्यात मुलाच्या ताब्यासाठी केस चालू होती. दरम्यान मुलाच्या जन्मानंतरही अझारेंकाने आपला खेळ सुरू ठेवला आहे.
26 वर्षीय स्टार टेनिसपटू नाओमी ओसाका हिने जुलै 2023 मध्ये मुलगी शाय हिला जन्म दिला. त्यामुळे काही काळ ती टेनिसपासून दूर होती. मात्र ती ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेत खेळण्यासाठी परतली आहे.