Manish Jadhav
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (बीपीएल) खळबळ उडवून दिली आहे. आपल्या मारक गोलंदाजीच्या जोरावर त्याने एक मोठा विक्रमही केला.
बीपीएलचा पाचवा सामना दरबार राजशाही आणि ढाका कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी (2 जानेवारी) खेळला गेला. या टी-20 सामन्यात तस्किनचे तूफान पाहायला मिळाले.
ढाका संघाचे फलंदाज तस्किनसमोर असहाय दिसत होते. तस्किनने 4 षटकात केवळ 19 धावा देत 7 बळी घेतले. त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याचा संघ दरबार राजाशाहीनेही या मोसमातील पहिला विजय नोंदवला.
तस्किनने 7 विकेट घेण्यासोबतच अनेक रेकॉर्डही केले. त्याने बीपीएलच्या इतिहासात प्रथमच ही कामगिरी केली आहे यापूर्वी बीपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोहम्मद आमिरच्या नावावर होता. त्याने 17 धावांत 6 बळी घेतले.
इतकेच नाही तर फ्रँचायझी T20 लीगच्या कोणत्याही सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारा तस्किन नंबर 1 गोलंदाज बनला आहे, तर T20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करणारा तो तिसरा गोलंदाज बनला आहे.
ढाका कॅपिटल्सने तस्किन अहमदच्या संघ दरबार राजशाहीविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. तस्किनच्या घातक गोलंदाजीनंतरही त्याने 20 षटकांत 174 धावा केल्या होत्या.