Manish Jadhav
अफगाणिस्तानमधील लोकशाहीवादी शासन उलथवून लावत तालिबानने आपली सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन केल्यानंतर तालिबानने जगाला आश्वासन दिले होते की, ते महिलांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादणार नाहीत. मात्र ते आश्वास पाळले गेले नाही.
अफगाणिस्तानातील महिलांची स्थिती दयनीय आहे. अफगाण महिलांची स्थिती पूर्वीपासून फारशी चांगली नव्हती, पण जेव्हापासून तालिबानने सत्तेची सूत्रे हाती घेतली, तेव्हापासून महिलांची स्थिती अधिक दयनीय होत चालली आहे.
तालिबान राजवटीने महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. आता याच क्रमाने तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा याने महिलांविरोधात एक नवीन फर्मान जारी केला आहे.
या फर्मानानुसार, पतीशिवाय इतर पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल दोषी आढळल्यास महिलेला दगडाने ठेचून ठार मारण्यात येईल.
दरम्यान, मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा याचा एक ऑडिओ मेसेजही समोर आला आहे. या ऑडिओ मेसेजमध्ये अखुंदजादाने पाश्चात्य देशांच्या लोकशाहीला आव्हान देत शरियाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर देशात शरिया कायदा लागू केला जाईल, असे तालिबानने म्हटले होते. इस्लामला मानणाऱ्या लोकांसाठी शरिया ही एक कायदेशीर व्यवस्था आहे. ही व्यवस्था सध्या अनेक इस्लामिक देशांमध्ये लागू आहे.