Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने 3 डिसेंबर 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात 6 धावांनी विजय मिळवला.
या विजयासह भारताने 5 सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली.
या टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवने केले होते.
त्यामुळे आता सूर्यकुमारने कर्णधार म्हणून पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याचा पराक्रमही केला आहे.
याबद्दल बोलताना सूर्यकुमारने आनंद व्यक्त केला असून तो म्हणाला, 'मालिका जिंकल्याबद्दल मला छान वाटत आहे. त्यातच कर्णधार असल्याने आणखी मस्त वाटतंय. आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली आहे.'
सूर्यकुमार हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्व करणारा एकूण 13 वा कर्णधार आहे.
सूर्यकुमारपूर्वी विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारताचे टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्व केले आहे.
सूर्यकुमार आता 10 ते 14 डिसेंबर 2023 दरम्यान दक्षिण आफ्रिका दौऱ्यात होणाऱ्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतही वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.