Sameer Amunekar
जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर केवळ निवांत बसायचे नसेल, तर तारकर्ली तुमच्यासाठी बेस्ट आहे. येथील पारदर्शक पाणी आणि स्कुबा डायव्हिंगचा अनुभव अविस्मरणीय असतो. जवळच असलेला सिंधुदुर्ग किल्ला इतिहासाची साक्ष देतो.
श्रद्धा आणि निसर्गसौंदर्याचा सुरेख संगम म्हणजे गणपतीपुळे. येथील पांढऱ्या शुभ्र वाळूचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि प्राचीन गणेश मंदिर पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. उन्हाळ्यात येथील कोकणी मेजवानी आणि हापूस आंब्याचा आस्वाद घेण्यासारखा असतो.
उन्हाळ्यात कोकणात थोडा थंडावा हवा असेल, तर दापोलीला नक्की जा. येथील कर्दे आणि लाडघर बीचेस खूप प्रसिद्ध आहेत. शिवाय येथील कृषी विद्यापीठाचा परिसर आणि थंड हवामानामुळे याला कोकणचे महाबळेश्वर म्हटले जाते.
कोलाहल आणि गर्दीपासून दूर जायचे असेल, तर वेंगुर्ला हा उत्तम पर्याय आहे. येथील नवती आणि भोगवे बीचवरील निळेशार पाणी पाहून तुम्ही परदेशातील बीचेस विसरून जाल. इथल्या दीपगृहावरून दिसणारा सूर्यास्त डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो.
पुणे आणि मुंबईकरांसाठी हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय ठिकाण आहे. दिवेआगरचा अथांग समुद्र आणि तिथल्या सुपारीच्या बागांमध्ये फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. फॅमिली ट्रिपसाठी ही सुरक्षित आणि शांत ठिकाणे आहेत.
नारळ-पोफळीच्या बागा आणि अत्यंत स्वच्छ समुद्रकिनारा ही गुहागरची ओळख आहे. येथील व्याडेश्वर मंदिर आणि जवळच असलेला अंजनवेलचा दीपस्तंभ पाहण्यासारखा आहे. अस्सल कोकणी संस्कृती अनुभवायची असेल, तर गुहागरला नक्की भेट द्या.
जर तुम्हाला शांतता हवी असेल आणि गोव्याच्या जवळ राहायचे असेल, तर शिरोडा बीच अतिशय सुंदर आहे. येथील लांबच लांब पसरलेली वाळू आणि माडांची झाडे मनाला शांती देतात. तसेच आरोंदा येथील 'बॅकवॉटर्स'चा आनंदही तुम्ही घेऊ शकता.