Manish Jadhav
श्रीवर्धनचा समुद्रकिनारा त्याच्या पांढऱ्या शुभ्र वाळूसाठी आणि स्वच्छ निळ्या पाण्यासाठी ओळखला जातो. सुमारे 3-4 किलोमीटर लांब पसरलेला हा किनारा पर्यटकांना शांततेचा अनुभव देतो.
किनाऱ्यालगत असलेल्या सुरुच्या झाडांची रांग या ठिकाणचे सौंदर्य अधिकच वाढवते. दुपारच्या कडक उन्हातही या झाडांच्या सावलीत बसून समुद्र न्याहाळण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
श्रीवर्धन हे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून येथे पेशव्यांचे स्मारक आणि जुन्या काळातील कोकणी घरे पाहायला मिळतात.
साहसी पर्यटकांच्या आवडीसाठी येथे बनाना राईड, जेट स्की आणि पॅरासेलिंग यांसारखे विविध वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. सुरक्षित आणि कमी खोलीचा समुद्र असल्यामुळे मुलेही येथे आनंदाने खेळू शकतात.
श्रीवर्धनच्या किनाऱ्यावरुन दिसणारा सूर्यास्त अत्यंत विलोभनीय असतो. आकाशात उमटणारे विविध रंग आणि समुद्राच्या लाटांचे संगीत पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
समुद्रकिनाऱ्यापासून जवळच सोमजाई देवीचे प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे. पेशवे घराण्याचे कुलदैवत असलेल्या या मंदिरात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
कोकणात आल्यावर ताजी मासळी आणि सोलकढीचा आस्वाद घेतल्याशिवाय सहल पूर्ण होत नाही. श्रीवर्धनमध्ये स्थानिक पद्धतीचे 'प्रॉन्स फ्राय' आणि 'सुरमई थाळी' पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.