Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची जी खोड मोडली, तो इतिहास आजही अंगावर शहारे आणतो.
औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान लाखोची फौज घेऊन पुण्यात शिरला आणि त्याने थेट महाराजांच्या बालपणीच्या 'लाल महाला'त आपला मुक्काम ठोकला. स्वराज्याच्या उरावर बसलेल्या या शत्रूला धडा शिकवणे अनिवार्य होते.
खानाच्या फौजेचा वेढा इतका कडक होता की, तिथे पाखरुही शिरु शकत नव्हते. अशा वेळी महाराजांनी निवडक 400 ते 600 मावळ्यांसह 'लग्नाच्या वरातीचे' आणि 'मोगल सैनिकांचे' सोंग घेऊन पुण्यात प्रवेश करण्याची गनिमी काव्याची योजना आखली.
रमजान महिन्याचे दिवस होते, मध्यरात्रीची वेळ आणि मोगल सैन्य गाढ झोपेत होते. महाराजांनी आपल्या तुकडीसह लाल महालाच्या स्वयंपाकघराच्या भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला आणि खानाच्या गोटात खळबळ उडाली.
महालात शिरताच 'हर हर महादेव'च्या गर्जनेने आसमंत दुमदुमला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोगल सैन्याची दाणादाण उडाली. महाराजांनी थेट खानाच्या शयनकक्षाकडे झेप घेतली आणि खानाची झोप उडाली.
महाराजांना समोर पाहताच घाबरलेला शाहिस्तेखान जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी मारुन पळू लागला. त्याच क्षणी महाराजांनी जोरदार वार केला आणि खिडकी धरलेल्या खानाच्या हाताची तीन बोटे कापली गेली. खान कसाबसा जीव वाचवून पळाला.
मोहीम फत्ते करुन परतताना मोगल सैन्य पाठलाग करेल हे महाराजांना ठाऊक होते. त्यांनी बैलांच्या शिंगांना पेटत्या मशाली बांधून त्यांना एका दिशेला सोडले आणि मोगल सैन्याला गुंगारा देऊन स्वतः मावळ्यांसह सुरक्षितपणे 'सिंहगडा'कडे कूच केली.
पुण्यासारख्या सुरक्षित ठिकाणी येऊन खुद्द राजाने खानाची बोटे छाटली, ही बातमी ऐकून औरंगजेब संतापला. खानाची प्रचंड बदनामी झाली आणि त्याला शिक्षा म्हणून थेट बंगालच्या सुभेदारीवर धाडण्यात आले.
या घटनेमुळे संपूर्ण हिंदुस्थानात शिवाजी महाराजांच्या नावाचा दरारा निर्माण झाला. मोगलांच्या अजेय शक्तीला महाराजांनी धूळ चारली आणि रयतेचा स्वराज्यावरील विश्वास अधिकच दृढ झाला.