Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. त्यापैकी एक अविस्मरणीय नाव म्हणजे शिवा काशीद.
आपल्या स्वामीनिष्ठेने आणि अद्वितीय पराक्रमाने शिवा काशीद यांनी इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. चला तर मग महाराजांसारख्या दिसणाऱ्या शिवा काशिद यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊया..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला नख लावण्याचा अनेक शत्रूंनी प्रयत्न केला. त्यापैकीच सिद्दी जोहर एक होता. 1660 मध्ये सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला. महाराज सिद्दीच्या वेढ्यात अडकले होते.
शिवा काशीद हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसण्यास हुबेहूब होते. त्यांचा चेहरा-मोहरा, शरीरयष्टी आणि आवाजही महाराजांशी मिळताजुळता होता. या साम्याचाच उपयोग महाराजांना सिद्दीच्या जोखडातून बाहेर पडण्यास मदत झाली.
वेढ्यातून निसटण्यासाठी एक धाडसी योजना आखण्यात आली. या योजनेनुसार, दोन पालख्या तयार करण्यात आल्या. एका पालखीत महाराजांचा वेश धारण करुन शिवा काशीद बसणार होते, तर दुसऱ्या पालखीतून खरे महाराज दुसऱ्या मार्गाने बाहेर पडणार होते.
महाराजांचा वेश धारण करणे म्हणजे मृत्यूला कवटाळणे हे शिवा काशीद यांना माहीत होते. तरीही त्यांनी स्वराज्यासाठी आणि महाराजांच्या प्राणासाठी आपला जीव धोक्यात घालण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही स्वामीनिष्ठा अतुलनीय होती.
रात्रीच्या वेळी, शिवा काशीद महाराजांच्या वेशात एका पालखीत बसले. ही पालखी मोठ्या सुरक्षा व्यवस्थेसह एका निश्चित मार्गाने बाहेर पडली. सिद्दी जौहरच्या सैन्याने या पालखीचा पाठलाग केला आणि त्यांना वाटले की, त्यांनी शिवाजी महाराजांना पकडले आहे.
मात्र, सिद्दीच्या सैन्याने शिवा काशीद यांना पकडले. थोड्या वेळाने सिद्दी जौहरला कळले की, त्याने पकडलेले शिवाजी महाराज नसून, महाराजांचा वेश धारण केलेला शिवा काशीद आहे. यानंतर, सिद्दी जौहरने क्रूरपणे शिवा काशीद यांचा शिरच्छेद केला. त्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण गमावले.
शिवा काशीद यांनी सिद्दीच्या सैन्याला गुंतवून ठेवले. याचा फायदा घेऊन, छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या पालखीतून विशाळगडाकडे सुरक्षितपणे निसटले. शिवा काशीद यांच्या बलिदानामुळेच महाराजांचे प्राण वाचले.
शिवा काशीद यांचे बलिदान हे केवळ त्यांच्या स्वामीनिष्ठेचेच नव्हे, तर स्वराज्याप्रती असलेल्या त्यांच्या निस्सीम प्रेमाचे प्रतीक आहे.