Manish Jadhav
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा समुद्रकिनारा आपल्या शांततेसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हा समुद्रकिनारा त्याच्या मऊ, पांढऱ्या शुभ्र वाळूसाठी ओळखला जातो. येथील पाणी अतिशय स्वच्छ आणि निळेशार असून प्रदूषणापासून दूर असलेला हा किनारा पर्यटकांना भुरळ घालतो.
आचरा गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. हे गाव 'इनामदार गाव' म्हणून ओळखले जाते. गावाची रचना आणि येथील जुन्या पद्धतीची कोकणी घरे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
किनाऱ्यापासून जवळच असलेले श्री देव रामेश्वर मंदिर हे अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थान मानले जाते. या मंदिराची भव्यता आणि ऐतिहासिक स्थापत्यशैली पाहण्यासारखी आहे.
आचरा किनाऱ्यावर पर्यटकांना डॉल्फिन पाहण्याची सुवर्णसंधी मिळते. सकाळी लवकर बोटीने समुद्रात जाऊन उड्या मारणारे डॉल्फिन पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.
आचरा किनाऱ्याला लागूनच सुंदर खाडी आहे. येथे मोठ्या प्रमाणात कांदळवन (मॅन्ग्रोव्हज) पाहायला मिळतात. पक्षीप्रेमींसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
मालवण किंवा तारकर्लीच्या तुलनेत आचरा येथे पर्यटकांची गर्दी कमी असते. ज्यांना शांततेत वेळ घालवायचा आहे आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हे 'परफेक्ट' डेस्टिनेशन आहे.
आचरा येथे आल्यावर स्थानिक मालवणी जेवणाचा आस्वाद घेणे मस्ट आहे. ताजी मासळी, सोलकढी आणि उकड्या तांदळाचा भात ही येथील खासीयत आहे. आचरा किनाऱ्यावरुन दिसणारा सूर्यास्त अतिशय मनमोहक असतो. क्षितिजावर मावळणारा सूर्य आणि त्याचा वाळूवर पडणारा सोनेरी प्रकाश फोटोग्राफीसाठी उत्तम आहे.