Manish Jadhav
दिवाळीत घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आणि फराळासोबत काहीतरी हेल्दी आणि शाही गोड पदार्थ देण्यासाठी 'अंजीर-खजूर रोल' हा सर्वोत्तम पर्याय आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने हा पदार्थ कसा बनवायचा, हे पाहूया:
या शाही रोलची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे यात साखरेचा अजिबात वापर केला जात नाही. खजूर आणि अंजीराच्या नैसर्गिक गोडव्यामुळे ही मिठाई खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट लागते.
सर्वप्रथम, सुके अंजीर आणि बिया काढलेले खजूर थोडे कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवा. त्यानंतर पाणी काढून मिक्सरमध्ये दोन्ही गोष्टी एकत्र करुन त्याची जाडसर आणि मऊ पेस्ट तयार करा.
काजू, बदाम आणि पिस्त्याचे बारीक तुकडे करा. आता एका कढईत थोडे साजूक तूप गरम करुन हे सर्व ड्रायफ्रूट्स मंद आचेवर हलके खमंग भाजून घ्या, जेणेकरुन खाताना छान क्रंच येईल.
कढईत पुन्हा एक चमचा तूप टाकून त्यात तयार केलेली खजूर आणि अंजीराची पेस्ट घाला. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि कढई सोडेपर्यंत 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर चांगले परतून घ्या.
पेस्ट चांगली परतल्यानंतर त्यात आधीच भाजलेले काजू, बदाम, पिस्ता आणि सुवासासाठी थोडी वेलची पूड टाका. हे सर्व मिश्रण एकत्र करुन हाताने चांगले एकजीव मळून घ्या.
मिश्रण थोडे कोमट असताना हाताला तूप लावून त्याचा लांबट रोल तयार करा. हा रोल दिसायला सुंदर आणि शाही दिसावा म्हणून त्यावर वरुन खसखस किंवा पिस्त्याचे बारीक काप लावून घोळवून घ्या.
तयार झालेला रोल बटर पेपर किंवा फॉईल पेपरमध्ये घट्ट गुंडाळून 10 ते 15 मिनिटे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. तो चांगला सेट झाल्यावर चाकूने त्याच्या गोल आणि आकर्षक चकत्या (वड्या) कापा. दिवाळी पाहुणचारासाठी शाही अंजीर-खजूर रोल तयार आहे!