Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात 25 जानेवारी ते 11 मार्च 2024 दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे.
या मालिकेतील दुसरा सामना 2 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. त्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय संघात काही बदल केले आहेत.
केएल राहुल आणि रविंद्र जडेजा दुसऱ्या कसोटीतून दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. अशात सर्फराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
यामुळे सध्या सर्फराजबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. खरंतर सर्फराज गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे.
सर्फराजने गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढल्या आहेत. पण तरी त्याला भारतीय संघात संधी मिळत नव्हती, त्यामुळे अनेकदा भारतीय संघाच्या निवड समितीवर टीकाही झाली.
अखेर सर्फराजला भारतीय संघात स्थान मिळाल्याने त्याच्या कष्टाचे चीज झाल्याच्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत.
सर्फराज नुकताच भारतीय अ संघाकडून इंग्लंड अ संघाविरुद्ध दोन चारदिवसीय सामने खेळला असून यातही त्याने दुसऱ्या सामन्यात 161 धावांची खेळी केली होती. तसेच पहिल्या सामन्यातही अर्धशतक झळकावले होते.
सर्फराजने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 45 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 69.85 च्या सरासरीने 3912 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 5 विकेट्सही घेतल्या आहेत.