Manish Jadhav
सरसगड हा किल्ला स्वराज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करुन तो अभेद्य केला, जेणेकरुन कोकण किनारपट्टीवर नजर ठेवता येईल.
ऐतिहासिक नोंदींनुसार, शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या बांधकामासाठी आणि बळकटीकरणासाठी त्याकाळी सुमारे 500 होन खर्च केले होते. यावरुन या किल्ल्याचे महत्त्व अधोरेखित होते.
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वराचे रक्षण करण्यासाठी सरसगड हा मुख्य संरक्षक किल्ला म्हणून ओळखला जाई. स्वराज्यातील धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी महाराजांनी या किल्ल्याला विशेष महत्त्व दिले होते.
शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्यावर अनेक वास्तूंचे बांधकाम करण्यात आले. किल्ल्याचा विस्तार जरी लहान असला, तरी त्याची तटबंदी आणि बुरुज शत्रूला रोखण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे बांधले गेले आहेत.
सरसगड आणि सुधागड हे दोन किल्ले एकमेकांशी भौगोलिकदृष्ट्या जोडलेले आहेत. महाराजांच्या रणनीतीनुसार, एका किल्ल्यावर संकट आल्यास दुसऱ्या किल्ल्यावरुन मदत पोहोचवणे सोपे व्हावे, अशी या किल्ल्यांची रचना होती.
गडावर आजही शिवकालीन पाण्याचे टाके पाहायला मिळतात. गडावर राहणाऱ्या मावळ्यांसाठी वर्षभर पिण्याच्या पाण्याची सोय असावी, या उद्देशाने महाराजांनी खडकात खोदून ही टाके तयार करुन घेतली होती.
सह्याद्रीच्या रांगा आणि कोकणचा प्रदेश यांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी सरसगड हे महाराजांचे एक महत्त्वाचे टेहळणी केंद्र होते. इथून सभोवतालच्या परिसरावर आणि शत्रूच्या हालचालींवर सहज नियंत्रण मिळवता येत असे.
शिवाजी महाराजांच्या काळात सरसगडावर मावळ्यांची मोठी फळी तैनात असायची. गडावर आजही घरांचे अवशेष आणि सदरेच्या खुणा पाहायला मिळतात, ज्या त्या काळातील लष्करी वास्तव्याची साक्ष देतात.