Manish Jadhav
संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत, गनिमी काव्यासोबतच आक्रमक आणि जलद हल्ल्याच्या तंत्राचा वापर केला. त्यांनी शत्रूला बचावाची संधी न देता अचानक हल्ले केले, ज्यामुळे मोगल आणि इतर शत्रूंची पुरती झोप उडाली.
संभाजी महाराजांनी मराठा आरमाराचे महत्त्व ओळखले. त्यांनी आपल्या आरमाराला अधिक बळकट केले आणि पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रजांना समुद्रात शह दिला.
संभाजी महाराजांनी मोगलांचा मुख्य शत्रू म्हणून सामना केला, पण त्याचवेळी विजापूरची आदिलशाही, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी यांसारख्या शत्रूंशी एकाच वेळी यशस्वीपणे लढा दिला.
वडिलांप्रमाणेच संभाजी महाराजांनीही किल्ल्यांचा वापर आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी केला. त्यांनी अनेक नवे किल्ले बांधले, जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली आणि किल्ल्यांच्या साहाय्याने शत्रूंना जेरीस आणले.
महाराजांनी आपली गुप्तहेर यंत्रणा अधिक मजबूत केली होती. यामुळे त्यांना शत्रूंच्या हालचालींची आणि योजनांची अचूक माहिती मिळत असे. या माहितीच्या आधारे ते शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी योग्य नियोजन करु शकत होते.
तसेच, महाराजांनी आपल्या सरदारांना आणि सैनिकांना नेहमी प्रोत्साहन दिले. त्यांनी त्यांना योग्य प्रशिक्षण आणि आधुनिक शस्त्रे दिली.
संभाजी महाराजांनी अचानक हल्ला करण्याच्या तंत्रात प्राविण्य मिळवले होते. त्यांनी शत्रूच्या प्रदेशात घुसून अनपेक्षित हल्ले केले. औरंगजेबाच्या दख्खनमधील स्वारीदरम्यान संभाजी महाराजांनी मोगलांना सातत्याने हैरान केले.
महाराजांनी युद्धनीतीमध्ये फक्त लष्करी बाबींचाच विचार केला नाही, तर त्यांनी आपल्या सैन्यात आणि समाजात एकोपा राखला. त्यांनी कोणत्याही जाती-धर्माचा भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक दिली, ज्यामुळे सर्वजण स्वराज्यासाठी एकत्र लढले.