Sameer Amunekar
बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान गेल्या दोन दशकांपासून अॅक्शन चित्रपटांचा चेहरा ठरला आहे.
‘वाँटेड’ आणि ‘दबंग’नंतर त्याच्या करिअरला नवसंजीवनी मिळाली आणि त्याने अनेक गाजलेले अॅक्शनपट दिले, मात्र आता वय वाढल्याने या अॅक्शन भूमिकांमध्ये मेहनत अधिक घ्यावी लागते, हे खुद्द सलमान खाननं कबूल केलं आहे.
मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात सलमान खाननं आपल्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाबाबत माहिती दिली.
भारत-चीन यादरम्यान २०२० मध्ये गलवान खोऱ्यात घडलेल्या संघर्षावर आधारित हा युद्धपट असून, दिग्दर्शन अपूर्व लखिया करत आहेत. “या चित्रपटातील अॅक्शन खूप प्रचंड आहे. शरीराला जास्त त्रास होतोय.
दरवर्षी नव्हे तर दरमहा, दररोज अॅक्शन करणे कठीण होत चाललं आहे.” असं सलमान म्हणाला. ‘बॅटल ऑफ गलवान’साठी सलमान लडाखमध्ये २० दिवस आणि थंड पाण्यात ७-८ दिवस चित्रीकरण करणार आहे.
“जेव्हा मी हा चित्रपट साइन केला, तेव्हा वाटलं की भन्नाट आहे, पण प्रत्यक्षात तो खूप कठीण आहे,” असंही तो म्हणाला.
सलमाननं स्पष्ट केलं आहे की, हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार नाही असंही त्याने सांगितले आहे.