Manish Jadhav
साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ला मानला जातो. समुद्रसपाटीपासून याची उंची सुमारे 5141 फूट आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील हा किल्ला स्वराज्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करणारा प्रमुख कणा होता.
साल्हेरचा किल्ला इतिहासात अजरामर झाला तो 1672 मध्ये झालेल्या महासंग्रामामुळे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने मुघलांचा मैदानी लढाईत निर्णायक पराभव केला होता. मराठ्यांनी मुघलांविरुद्ध समोरासमोर लढून जिंकलेली ही पहिली मोठी लढाई होती.
या लढाईत सरनोबत प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळे यांनी गनिमी काव्याऐवजी मुघलांच्या बलाढ्य सैन्याचा मैदानात सामना केला. सुमारे 20,000 मुघल सैनिकांचा पराभव करुन मराठ्यांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले होते.
महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला 1671 मध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने जिंकून घेतला होता. त्यानंतर मुघलांनी हा किल्ला पुन्हा मिळवण्यासाठी मोठे सैन्य धाडले, पण मराठ्यांनी ते परतवून लावले.
साल्हेरच्या किल्ल्याला तीन मुख्य प्रवेशद्वारे असून त्याची तटबंदी आजही भक्कम आहे. गडावर जाण्यासाठी असलेले खडकात कोरलेले जिने आणि अरुंद वाटा शत्रूला रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी होत्या.
गडावर पिण्याच्या पाण्याचे अनेक टाके आहेत, जे आजही बारमाही भरलेले असतात. तसेच धान्याची कोठारे आणि दारुगोळा ठेवण्याच्या जागा त्या काळातील लष्करी सज्जतेची साक्ष देतात.
साल्हेर आणि मुल्हेर हे दोन किल्ले नेहमीच जोडीने ओळखले जातात. खान्देश आणि बागलाण प्रांतावर नियंत्रण ठेवण्यासाठी या दोन्ही किल्ल्यांचे स्थान भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे होते.
साल्हेरच्या विजयानंतर शिवाजी महाराजांच्या सैन्याचा दरारा संपूर्ण हिंदुस्थानात पसरला. या विजयामुळे मुघलांच्या मनात मराठ्यांबद्दल भीती निर्माण झाली आणि स्वराज्याचा आत्मविश्वास द्विगुणित झाला.