Manish Jadhav
सातारा जिल्ह्यातील सज्जनगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु समर्थ रामदास स्वामी यांचे निवासस्थान आणि समाधी स्थळ म्हणून ओळखला जातो. याच गडावर त्यांनी आपले अखेरचे दिवस व्यतीत केले होते.
या किल्ल्याचे मूळ नाव 'परळीचा किल्ला' असे होते. पुढे समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे या किल्ल्याला 'सज्जनगड' असे नाव देण्यात आले. हा किल्ला शिलाहार राजा भोज (दुसरा) याने बांधला होता.
इतिहासात या गडाला विशेष महत्त्व आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींच्या अनेक महत्त्वाच्या भेटी याच गडावर झाल्याचे मानले जाते. स्वराज्याच्या कार्यात महाराजांना समर्थांचे मार्गदर्शन लाभले.
गडाच्या मध्यभागी समर्थ रामदास स्वामींची सुंदर समाधी आहे. या मंदिराच्या खाली एक गुप्त तळघर असल्याचे सांगितले जाते, जिथे समर्थ ध्यानधारणा करत असत. आजही येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
समर्थांना चाफळच्या नदीत श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती सापडल्या होत्या. त्या मूर्तींची स्थापना करण्यापूर्वी त्या काही काळ सज्जनगडावर ठेवण्यात आल्या होत्या. गडावर प्राचीन अंगलाई देवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे.
गडावर पाण्याचे अनेक हौद आणि टाके आहेत, त्यापैकी 'सोनटाळे' हे अतिशय प्रसिद्ध आहे. डोंगरमाथ्यावर असूनही या कुंडातील पाणी कधीही आटत नाही, हे विशेष.
समर्थांनी प्रसिद्ध ग्रंथ 'दासबोध' पूर्ण करण्याचे काम याच गडाच्या परिसरात केले असे मानले जाते. गडावर दरवर्षी रामनवमी आणि दासनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
सातारा शहरापासून अवघ्या 10-12 किमी अंतरावर असलेला हा गड समुद्रसपाटीपासून 3000 फूट उंचीवर आहे. गडावरुन उरमोडी धरणाचा जलाशय आणि साताऱ्याच्या डोंगररांगांचे विलोभनीय दृश्य दिसते.