Manish Jadhav
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरुच आहे. रशियाचे सैन्य युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहेत. रशिया युक्रेनच्या शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ले करत आहे.
रशियाने युक्रेनवर 110 क्षेपणास्त्रे डागली आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ही माहिती दिली आहे. झेलेन्स्की म्हणाले की, काल रात्री रशियाने युक्रेनवर सुमारे 110 क्षेपणास्त्रे डागली.
22 महिन्यांतील रशियाने केलेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियन हल्ला 18 तास चालला आणि बहुतेक रशियन क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केले. यात 18 युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
झेलेन्स्की म्हणाले की, क्रेमलिन सैन्याने या हल्ल्यांमध्ये बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला. यासोबतच विविध प्रकारच्या शस्त्रांचा वापर करण्यात आला.
युक्रेनचे लष्करी प्रमुख व्हॅलेरी झालुझनी यांनी सांगितले की, युक्रेनच्या हवाई दलाने रात्रभर 87 क्षेपणास्त्रे आणि 27 प्रकारचे ड्रोन रोखले, अशी बातमी एपीने दिली.
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला होता. या युद्धात अमेरिकेसह पाश्चात्य देश युक्रेनला पाठिंबा देत आहेत.
अमेरिका युक्रेनला आर्थिक मदत आणि लष्करी सामग्री पुरवत आहे.