Pranali Kodre
ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना ऑस्ट्रेलियाचा साथीदार मॅथ्यू एब्डेनसह अंतिम सामन्यात पोहचला आहे.
बोपन्ना आणि एब्डेन जोडीने या स्पर्धेत उपांत्य फेरीत झँग झिझेन आणि थॉमस मॅचॅक या जोडी 2 तास 2 मिनिटे चाललेल्या सामन्यात 6-3,3-6,7-6 (10-7) अशा तीन सेटमध्ये विजय मिळवला. या विजयासह बोपन्ना आणि एब्डेन यांनी अंतिम सामना गाठला.
दरम्यान बोपन्ना आणि एब्डेन या दोघांनी सलग दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यांनी वर्षातील चौथ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत म्हणजे अमेरिकन ओपन 2023 चाही अंतिम सामना खेळला होता.
इतकेच नाही, तर आता 43 वर्षीय बोपन्नाने जागतिक क्रमवारीत पुरुष दुहेरीमध्ये अव्वल क्रमांकही निश्चित केला आहे. तो त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अव्वल क्रमांकावर पोहचला आहे.
बोपन्ना जागतिक क्रमवारीमध्ये दुहेरीत अव्वल क्रमांक पटकावणारा भारताचा चौथा टेनिसपटू आहे. यापूर्वी लिअँडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनी असा कारनामा केला आहे.
बोपन्ना जागतिक क्रमवारीत पुरुष दुहेरीमध्ये अव्वल क्रमांक मिळवणारा सर्वात वयस्कर खेळाडू आहे.
दरम्यान, बोपन्ना तब्बल 17 व्या प्रयत्नांनंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीमध्ये पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन 2023 मध्ये सानिया मिर्झासह मिश्र दुहेरीत अंतिम सामना खेळला होता.
आता बोपन्ना ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरणार आहे.