Sameer Amunekar
हल्लीच्या काळात अनेक पालक लहान मुलांमध्ये वाढता हट्टीपणा, राग, चिडचिड याबद्दल चिंतेत असतात. यामागे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कारणे असू शकतात.
मुलांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण केल्याने ते हट्टी बनतात. त्यांना वाटते की ते हट्ट केला की लगेच त्यांची इच्छा पूर्ण होईल. मुलांवर जास्त नियंत्रण ठेवलं, तरी मुलांमध्ये रागाची भावना वाढते. त्यामुळं मुलांना योग्य वयात स्वतः निर्णय घेण्याची सवय लावा.
आजकाल लहान मुलं जास्त वेळ मोबाईल, टॅबलेट, टीव्ही आणि गेम्समध्ये व्यस्त असतात. सतत स्क्रीनसमोर राहिल्याने मुलांचे मस्तिष्क उत्तेजित होते आणि त्यांना लवकरच राग येतो किंवा चिडचिड होते.
जास्त प्रमाणात जंक फूड, साखर, कोल्ड ड्रिंक्स, चॉकलेट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. काही पदार्थांमुळे अति उर्जायुक्त (Hyperactivity) आणि चिडचिडेपणा वाढतो.
पुरेशी झोप न मिळाल्यास मुलं चिडचिडी, आळशी आणि हट्टी होतात. रात्री उशिरा झोपल्याने सकाळी लवकर उठल्यावर त्यांचा मूड बिघडतो.
जर पालक सतत तणावाखाली असतील किंवा घरात भांडणं होत असतील, तर मुलांवर त्याचा परिणाम होतो. आई-वडिलांचे सतत रागावणे किंवा त्यांना वेळ न देणे यामुळे मुलं हट्टी बनू शकतात.
मुलं त्यांच्या मित्रांकडून किंवा शाळेत शिकलेल्या गोष्टींचा प्रभाव घेतात. जर त्यांना चुकीच्या प्रकारे हट्टीपणा किंवा आक्रमकता दाखवणारे मित्र असतील, तर त्यांची वागणूकही बदलू शकते.
काही पालक मुलांकडून जास्त अपेक्षा ठेवतात, ज्यामुळे मुलांवर तणाव येतो. सतत अभ्यास, शिस्त लावणे आणि त्यांना त्यांची मतं मांडू न देणे यामुळे ते विरोध करतात.