Manish Jadhav
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर नेहमीच काही ना काही विक्रम असतात.
इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत पंतने आतापर्यंत फलंदाजीने शानदार कामगिरी केली आहे.
आता ऋषभ पंतला लॉर्ड्सवर आणखी एक इतिहास रचण्याची संधी असेल. पंतने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 86 षटकार मारले आहेत.
आता त्याला भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनण्याची संधी असेल.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 90 षटकार मारले. रोहित शर्माचे नाव यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हिटमॅनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 88 षटकार मारले. आता ऋषभ पंतकडे या दोन्ही फलंदाजांना मागे टाकण्याची सुवर्णसंधी असेल.
पंतला रोहित शर्माला मागे टाकण्यासाठी तीन षटकार आणि सेहवागला मागे टाकण्यासाठी पाच षटकारांची आवश्यकता आहे.
या मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, पंतने आतापर्यंत चार डावात 13 षटकार मारले आहेत. तो या मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. आता लॉर्ड्सवर पंत हा विक्रम मोडू शकतो की नाही हे पाहणे बाकी आहे.
लीड्स येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात ऋषभ पंतने शतक झळकावले. पहिल्या डावात त्याने 134 धावा तर दुसऱ्या डावात 118 धावा करुन तो बाद झाला.
एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक झळकावले. तिथे त्याने 58 चेंडूत 65 धावा केल्या. मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यांमध्ये पंतला हाच फॉर्म कायम ठेवायचा आहे.