Manish Jadhav
2022 मध्ये विक्री कमी झाल्याने पहिल्या जनरेशनच्या डस्टरचे उत्पादन बंद करण्यात आले होते. मात्र आता रेनॉल्ट ही लोकप्रिय एसयूव्ही तिच्या नव्या अवतारात भारतीय बाजारपेठेत पुन्हा लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे.
रेनॉल्टने दुसरी जनरेशन वगळून थेट तिसऱ्या जनरेशनची डस्टर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जुन्या मॉडेलच्या तुलनेत ही गाडी आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन डिझाइनसह बाजारात येईल.
ही नवीन डस्टर बाजारात सध्या लोकप्रिय असलेल्या हुंडाई क्रेटा, किया सेल्टोस, मारुती ग्रँड विटारा आणि टोयोटा हायरायडर यांसारख्या गाड्यांना थेट टक्कर देईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन 2026 रेनॉल्ट डस्टरची भारतात टेस्टिंग सुरु झाली आहे. नुकतेच, एका टेस्टिंग मॉडेलला बंगळुरुमध्ये कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.
नवीन डस्टरला 'Y' आकाराचे एलईडी लाइटिंग, रेनॉल्टचा नवीन लोगो आणि शार्प डिझाइन मिळू शकते. स्पाई फोटोनुसार, यामध्ये रुफ रेल्स, शार्क फिन अँटेना आणि रुफ-माउंटेड स्पॉइलर यांसारखे फीचर्स असतील.
या एसयूव्हीमध्ये मागील मॉडेलपेक्षा अधिक प्रीमियम केबिन मिळेल. यामध्ये मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो/ॲपल कारप्ले, वायरलेस फोन चार्जर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांसारखे फीचर्स असतील.
नवीन डस्टरमध्ये सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग्स, रिअर पार्किंग सेन्सर आणि 360-डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स असतील. याशिवाय, यात आधुनिक ADAS (अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम) तंत्रज्ञानही समाविष्ट केले जाईल.
रेनॉल्ट ही नवीन एसयूव्ही पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याची शक्यता आहे. भारतीय ग्राहक या नव्या डस्टरची आतुरतेने वाट पाहत आहेत.