Sameer Amunekar
नात्यात जेव्हा संवाद कमी होतो, तेव्हा गैरसमज वाढू लागतात. मनातल्या गोष्टी स्पष्टपणे न सांगता जोडीदाराने त्या समजून घ्याव्यात, ही अपेक्षा दुरावा निर्माण करते. त्यामुळे रोज किमान १५-२० मिनिटे एकमेकांशी मनापासून बोला.
आपल्या जोडीदाराची किंवा नात्याची तुलना इतरांच्या सोशल मीडियावरील फोटोंशी किंवा दुसऱ्या जोडप्यांशी करणे टाळा. प्रत्येक नातं वेगळं असतं. तुलना केल्यामुळे जोडीदाराच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो.
रागाच्या भरात चुकीचे शब्द वापरणे किंवा चार लोकांसमोर जोडीदाराचा अपमान करणे नात्याचा पाया कमकुवत करते. आदर नसेल तर प्रेम फार काळ टिकू शकत नाही. मतभेद असले तरी भाषेत सन्मान ठेवा.
नात्यात असूनही प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे वैयक्तिक अवकाश (Space) हवे असते. जोडीदाराचा फोन तपासणे, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर संशय घेणे किंवा त्यांच्या छंदांना विरोध करणे यामुळे गुदमरल्यासारखे वाटू शकते.
भांडण एका गोष्टीवर सुरू असताना अचानक जुन्या संदर्भातील चुका काढल्याने वाद विकोपाला जातो. वर्तमानकाळातील समस्या सोडवण्यावर लक्ष द्या, भूतकाळातील ओझं नात्यावर लादू नका.
नात्यात 'गृहीत धरणे' (Taking for granted) ही मोठी चूक आहे. जोडीदार तुमच्यासाठी करत असलेल्या लहान-लहान गोष्टींचे कौतुक करायला विसरू नका. कृतज्ञतेची भावना नात्यात गोडवा टिकवून ठेवते.
एकाच घरात असूनही एकमेकांकडे दुर्लक्ष करून मोबाईलमध्ये गुंतून राहणे सध्या दुराव्याचं मोठं कारण ठरत आहे. 'क्वालिटी टाइम' घालवणे म्हणजे केवळ सोबत असणे नव्हे, तर एकमेकांच्या विचारात आणि गप्पांत सहभागी होणे होय.