Manish Jadhav
रणथंबोर किल्ल्याच्या निर्मितीबाबत इतिहासकारांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मात्र, बहुतांश इतिहासकारांनुसार या किल्ल्याचे बांधकाम इ.स. 944 च्या सुमारास चौहान वंशातील राजे 'सपलादक्ष' किंवा 'जयंत' यांनी सुरु केले होते.
12व्या शतकात भारताचे महान सम्राट पृथ्वीराज चौहान (तिसरे) यांच्याशी या किल्ल्याचा इतिहास जोडला गेला. इ.स. 1992 मध्ये तराईनच्या दुसऱ्या युद्धात पृथ्वीराज चौहान यांच्या पराभवानंतर, त्यांचा मुलगा 'गोविंदराज' यांनी रणथंबोरला आपली राजधानी बनवले.
इ.स. 1283 ते 1301 या काळात रणथंबोरवर राजे 'हम्मीर देव चौहान' यांचे राज्य होते. त्यांचा हा काळ या किल्ल्याचा सुवर्णकाळ मानला जातो.
राजे हम्मीर देव यांनी खिलजीच्या बंडखोर मंगोल सैनिकाला आश्रय दिला होता. याच रागातून दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने इ.स. 1300 मध्ये रणथंबोर किल्ल्याला वेढा घातला. चौहान सैन्याने खिलजीच्या सैन्याला कित्येक महिने चोख प्रत्युत्तर दिले आणि सुलतानला मागे हटण्यास भाग पाडले होते.
इ.स. 1301 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने कपटाचा अवलंब करुन किल्ल्यातील काही मंत्र्यांना लाच दिली आणि रसद पुरवठा तोडला. युद्धात राजा हम्मीर देव वीरगतीला प्राप्त झाले.
चौहान घराण्यानंतर हा किल्ला मेवाडच्या राणा हम्मीर सिंह आणि राणा कुंभा यांच्या ताब्यात होता. पुढे इ.स. 1569 मध्ये मुघल सम्राट अकबराने जयपूरचे राजे मानसिंग यांच्या मदतीने हा किल्ला जिंकला.
17व्या शतकात मुघल साम्राज्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर हा किल्ला जयपूरच्या कच्छावा राजांच्या ताब्यात आला. जयपूरच्या महाराजांनी या किल्ल्याचा आणि सभोवतालच्या घनदाट जंगलाचा वापर स्वतःचे 'शिकारीचे खाजगी ठिकाण' म्हणून केला.