Manish Jadhav
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ असलेला 'राजमाची किल्ला' स्वराज्यातील एक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला होता. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये कल्याण आणि भिवंडीच्या मोहिमेवर असताना हा किल्ला स्वराज्यात सामील करुन घेतला. या किल्ल्यामुळे बोरघाटातील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवणे सोपे झाले.
राजमाची किल्ला म्हणजे प्रत्यक्षात दोन बालेकिल्ल्यांचा समूह आहे. एक म्हणजे उंच असा 'श्रीवर्धन' आणि दुसरा म्हणजे पसरट असा 'मनरंजन' किल्ला.
कोकण आणि मावळ यांना जोडणाऱ्या ऐतिहासिक 'बोरघाटावर' नियंत्रण ठेवण्यासाठी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी केली आणि तिथे कडक पहारा तैनात केला.
राजमाचीची तटबंदी आणि बुरुज आजही महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. इथल्या 'श्रीवर्धन' किल्ल्यावरुन संपूर्ण मावळ प्रांतावर नजर ठेवता येते.
किल्ल्यावर काळभैरवाचे प्राचीन मंदिर, पाण्याच्या टाक्या आणि जुन्या वाड्यांचे अवशेष आजही पाहायला मिळतात, जे आपल्याला शिवकाळाची आठवण करुन देतात.
महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही या किल्ल्याने मुघलांशी जोरदार लढा दिला. 1704 मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकला, पण अवघ्या एका वर्षात मराठ्यांनी तो पुन्हा स्वराज्यात आणला.
आज राजमाची हा केवळ ऐतिहासिक किल्ला नसून ट्रेकर्ससाठी नंदनवन आहे. लोणावळ्यापासून कोंढाणे लेण्यांपर्यंतचा याचा मार्ग इतिहासाच्या पाउलखुणांनी भरलेला आहे.