Manish Jadhav
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये दिमाखात उभा असलेला राजगड हा केवळ किल्ला नसून शिवरायांच्या स्वप्नातील 'स्वराज्याचे पहिले सिंहासन' आहे. तब्बल 26 वर्षे हा किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणून ताठ मानेने उभा होता.
महाराजांनी आपल्या आयुष्यातील उमेदीची 25-26 वर्षे याच गडावर व्यतीत केली. अफझलखानाचे संकट असो वा शाहिस्तेखानावरील धाडसी छापा, अनेक मोठ्या मोहिमांचे नियोजन याच मातीतून झाले.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि शिवरायांचे छावा, युवराज संभाजी महाराज यांचे पाळणे याच गडावर हालले. शिवरायांच्या उत्तराधिकाऱ्याचा जन्म याच पवित्र भूमीवर झाला.
पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या तीन माच्यांच्या रुपात महाराजांनी गडाला त्रिसूत्री सुरक्षा कवच दिले होते. शत्रूला बालेकिल्ल्यापर्यंत पोहोचणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच होते.
आग्र्याच्या औरंगजेबाच्या तावडीतून सुटल्यानंतर, जेव्हा महाराज सुखरुप राजगडावर पोहोचले, तेव्हा जिजाऊ साहेबांच्या आणि संपूर्ण स्वराज्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले होते.
महाराजांच्या सुख-दुःखातील सोबती महाराणी सईबाई यांचे वास्तव्य आणि अंतिम काळ याच गडावर व्यतीत झाला. आजही त्यांची समाधी गडावर शिवरायांच्या निष्ठेची आठवण करुन देते.
एका साध्या डोंगराचे रुपांतर जगातील सर्वात भक्कम किल्ल्यात करण्याची किमया महाराजांच्या दूरदृष्टीने केली. 'प्रचंडगड' नावाचे सार्थक करत त्यांनी येथे स्वराज्याची पायाभरणी केली.
राजगडाचा बालेकिल्ला पाहताना शिवरायांच्या स्थापत्यशास्त्राचा आणि अभेद्य दुर्गमतेचा प्रत्यय येतो. प्रत्येक दगड आणि प्रत्येक बुरुज आजही महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगतो.