Pranali Kodre
कसोटी क्रिकेटमध्ये 100 सामने खेळणे हा मोठा टप्पा मानला जातो. 6 मार्च 2024 पर्यंत 76 खेळाडूंनी 100 कसोटी सामने खेळलेले आहेत. पण त्यानंतरच्या दोनच दिवसात हा आकडा 80 खेळाडूंवर पोहोचणार आहे.
कारण, 7 आणि 8 मार्च अशा दोन दिवसात आर अश्विन, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन आणि टीम साउदी हे चार खेळाडू 100 वा कसोटी सामना खेळताना दिसू शकतात.
7 मार्च रोजी धरमशाला येथे सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी मालिकेच्या पाचवा आणि अखेरच्या सामन्यात भारताचा आर अश्विन आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो यांना संधी मिळाली, तर हा त्यांचा कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असेल.
8 मार्च रोजी ख्राईस्टचर्च येथे सुरू होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिकेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम साऊदी आणि केन विलियम्सन खेळले, तर त्यांचाही हा 100 वा कसोटी सामना असेल.
आर अश्विनने आत्तापर्यंत खेळलेल्या 99 कसोटी सामन्यांत 507 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 3309 धावा केल्या आहेत.
बेअरस्टोने 99 कसोटी सामने खेळताना 5974 धावा केल्या आहेत. यात त्याने 12 शतके आणि 26 अर्धशतके केली आहेत. त्याने यातील 55 सामने यष्टीरक्षक म्हणूनही खेळले असून 216 विकेट्स घेतले आहेत.
न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सनने 99 कसोटी सामने खेळताना 8675 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 32 शतकांचा आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 30 विकेट्स घेतल्या आहेत.
न्यूझीलंडचा कसोटी कर्णधार टीम साऊदीने 99 कसोटी सामने खेळताना 378 विकेट्स घेकल्या आहेत. तसेच 2072 धावा केल्या आहेत.